जिजाऊ संस्कार’ त्रैमासिक पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

जिजाऊ संस्कार’ त्रैमासिक पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी: रफिक खान
उदयनगर: येथील शहाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, द्वारकाबाई खेडेकर प्राथमिक शाळा, आणि जिजाऊ बाल संस्कार कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होणाऱ्या ‘जिजाऊ संस्कार’ या त्रैमासिकाच्या प्रकाशन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या त्रैमासिकात इयत्ता ३ री ते १२ वी च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या विविध लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा शालेय समिती अध्यक्ष मनोज दादा खेडेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दिव्य मराठीचे पत्रकार जिया काजी, पुण्यनगरीचे पत्रकार रघुनाथ गवई, पत्रकार रफिक खान, आणि भारत गर्जनाचे पत्रकार सतीश पैठणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्प शहाजी राजे व द्वारकाबाई खेडेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर ‘जिजाऊ संस्कार’ मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, मैदानी स्पर्धेत तालुकास्तरावर २०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारा इयत्ता आठवीचा विद्यार्थी धीरज प्रमोद महाले याचा तसेच रग्बी या खेळात वयोगट १४ व १७ चा विभागीय स्तरासाठी पात्र ठरलेल्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अनंता चेके यांनी केले. त्यांनी 'जिजाऊ संस्कार' त्रैमासिकातील साहित्य आणि संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या विचारांबद्दल माहिती दिली. प्रमुख अतिथी रघुनाथ गवळी यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून दर्जेदार साहित्य निर्मितीचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात मनोज दादा खेडेकर यांनी ‘जिजाऊ संस्कार’ मासिकाच्या निर्मितीमागे संस्थेची भूमिका व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मितल देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर अवचार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर, सचिव रेखाताई खेडेकर, समन्वयक बाळासाहेब ठाकरे तसेच सर्व संचालक मंडळाने कौतुक केले.

Post a Comment

0 Comments