या कारवाईत तब्बल ६७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, CORT पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कथोरे, फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव तसेच जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा आणि पहूर गल्ली भागात अचानक छापेमार कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान ६ लाख १० हजार रुपये किमतीची ६७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली.
कारवाईदरम्यान एका ठिकाणी गोवंशाचे मांसही आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षित संगोपनासाठी जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत जामनेर पोलीस स्टेशन येथे एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनासोबत नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच शासन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

0 Comments