जळगाव: जळगाव पोलीसांच्या श्वान पथकातील विश्वासू आणि कुशल शोधक श्वान हॅप्पी आज सेवामुक्त झाला.
त्याच दिवशी पथकात नवीन बेल्जिअम मेलिनॉइस जातीचा श्वान शौर्य दाखल झाला.
गुन्हे शोध आणि शोधमोहीम कामासाठी सक्षम असलेला शौर्य हा 65 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्यात आला आहे.
सेवानिवृत्ती आणि नवीन श्वान समारंभ हा दोन्ही कार्यक्रम पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत पार पडला.
अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड, राखीव पोलिस निरीक्षक सुगरवार, श्वान पथक व BDDS प्रभारी देविदास वाघ तसेच पथकातील संदीप परदेशी, मनोज पाटील, निलेश झोपे आणि प्रशांत कंकरे यांचीही उपस्थिती होती.
हॅप्पीचा जन्म 5 जून 2015 रोजी झाला. त्याने 9 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पुणे येथील सीआयडीमध्ये पूर्ण केले. 1 ऑगस्ट 2015 पासून तो जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत होता.
या काळात त्याने अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली. त्याने मुक्ताईनगर, रामानंद, यावल आणि सावदा पोलीस ठाण्यांतील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा माग काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
इतकेच नाही तर 2018 मध्ये लखनौ येथे झालेल्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यात हॅप्पीने 5 वे स्थान मिळवून महाराष्ट्राला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला आणि त्याच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार संदीप परदेशी व मनोज पाटील यांना पोलिस महासंचालकांनी प्रत्येकी 10 हजारांचे पारितोषिक दिले.
हॅप्पीच्या सेवानिवृत्तीप्रसंगी जळगाव जिल्हा पोलीस दलाने त्याच्या उत्तम सेवेला मानाचा मुजरा करून अभिनंदन व्यक्त केले आहे.
श्वान शौर्यच्या आगमनाने पथकाची क्षमता अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments