जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) भुसावळ येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत परराज्यातील तीन आरोपींना नागपूर येथून अटक केली आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेले तब्बल १६ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी १ जून २०२६ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
३१ मे रोजी ते कामानिमित्त घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली होती.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८६/२०२६ दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार विविध पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी नागपूर शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने नागपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून राजू जसपालसिंग (रा. हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (रा. बिहार) आणि राजेश पारस शहा (रा. बिहार) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपींकडून चोरीतील एकूण १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच गोपाळ गव्हाणे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांचा समावेश होता.
भुसावळातील घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून मोठा मुद्देमाल हस्तगत केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments