जळगाव पोलिसांचा ऑपरेशन ऑल आऊट

जळगाव:
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या "ऑपरेशन ऑल आऊट" मोहिमेत मोठी यशस्वी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी विशेष मोहीम राबविण्यात आली.


 या मोहिमेत सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संशयित व्यक्ती, वाहने आणि गुन्हेगारांची तपासणी केली.
फरार आरोपी, पाहिजे आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध विशेष कारवाई करण्यात आली.


 मोहिमेदरम्यान दारुबंदीचे १९६ गुन्हे दाखल करून २१.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगाराच्या ७६ प्रकरणांत कारवाई झाली, तर मोटार वाहन कायद्यांतर्गत १,४४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ५६ जणांवरही कारवाई करण्यात आली.


 पोलीसांनी १३० धाबे आणि ८८ हॉटेल व लॉजेसची तपासणी केली.
तसेच ४२ नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) आणि ५२ बेलेबल वॉरंट (BW) बजावण्यात आले.
अवैध वाळू वाहतुकीच्या ६ तर अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १० गुन्हे दाखल करण्यात आले.

 
विशेष मोहिमेत २०१ जणांवर BNSS कलम १२६ तर १७ जणांवर BNSS कलम १२९ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या ३४ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला.
COTPA कायद्यान्वये २०३ प्रकरणे दाखल करण्यात आली. तसेच २ पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली असून ५ तडीपार आरोपींवर कारवाई करण्यात आली.

 स्थानिक गुन्हे शाखेनेही विशेष कामगिरी करत दारुबंदीच्या १० प्रकरणांत १.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगाराच्या ६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
एका पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली असून तीन तडीपार आरोपींवर कारवाई करण्यात आली.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र अधिनियमांतर्गत एक गुन्हाही दाखल करण्यात आला.

 या व्यापक मोहिमेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारांमध्ये प्रतिबंधक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments