जळगाव: जळगाव जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखा यांनी मोठी कारवाई करत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टी.डब्ल्यू.जे एसोसिएट्स प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या संचालक, शाखा व्यवस्थापक, एजंट आणि इतर संबंधितांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात तब्बल 279 गुंतवणूकदारांची 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील मिलिंद शालिकराव पाटील यांनी सुरुवातीला कंपनीच्या मुख्य संचालकांविरोधात तक्रार अर्ज दिला होता.
मात्र, आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल चौकशीत मिलिंद पाटील हेच TWJ Associates जळगाव शाखेचे फ्रँचायसी म्हणून काम पाहत असल्याचे निष्पन्न झाले.
ते गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारणे, करारनामे करणे तसेच मोठ्या प्रमाणात कमिशन घेणे या व्यवहारात सक्रिय असल्याचे उघड झाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, तसेच टी.डब्ल्यू.जे इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट प्राइवेट लिमिटेड चे संचालक संकेश रामकृष्ण घाग आणि जळगाव शाखेचे मिलिंद पाटील यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत संगनमताने गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष दाखवले.
विविध ठिकाणी सेमिनार घेऊन दरमहा जास्त परतावा मिळण्याचे आश्वासन देत नियमबाह्य योजना राबवण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गुंतवणूकदार भरत रतीलाल पवार, रा. पाळधी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 165/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 316(2), 316(5), 61(2) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 अंतर्गत कलम 21 आणि 23 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी मिलिंद शालिकराव पाटील (वय 41, रा. शिवकॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तसेच समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांना यापूर्वी ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्याने अटक केली असून सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
दरम्यान, TWJ Associates जळगाव शाखेत गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे सादर करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0 Comments