जळगाव: एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
दिनांक १७ मे २०२६ रोजी संतोष रणछोड सैंदाणे (रा. वाघ नगर, जळगाव) यांची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH 19 CL 7558 ही सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून चोरीला गेली होती.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महेंद्र गोपाल चव्हाण (रा. खोटे नगर) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (रा. पिंप्राळा हुडको) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून होंडा शाईन, टीव्हीएस वेगो, हिरो डिलक्स आणि बजाज पल्सर अशा एकूण चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0 Comments