जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस यांच्या वतीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
ही कारवाई श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील विविध ठिकाणी सुमारे २२५० संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३९९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच गंभीर नियमभंग करणारे एक वाहन जप्त करण्यात आले.
नाकाबंदी मोहिमेसाठी ३९ पोलीस अधिकारी आणि १९२ पोलीस अंमलदार असे एकूण २३१ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली.
कारवाईदरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १०६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या ९४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई झाली. तर विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या १२२ वाहनांवरही कारवाई करण्यात आली.
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८ चालकांविरोधात गुन्हे नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेने ६९ प्रकरणांमध्ये ५४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला, तर भुसावळ वाहतूक शाखेने १०३ प्रकरणांमध्ये ६९ हजार १०० रुपयांची कारवाई करत सर्वाधिक दंडात्मक नोंद केली.
जिल्ह्यात शांतता व सार्वजनिक सुरक्षितता कायम राखण्यासाठी अशा अचानक तपासणी मोहिमा पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

0 Comments