जळगावात 2.72 कोटींचा 1362 किलो गांजा नष्ट

जळगाव:
जळगाव पोलीस दलाच्या वतीने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये NDPS कायद्यान्वये दाखल 23 गुन्ह्यांतील तब्बल 2 कोटी 72 लाख 40 हजार रुपये किमतीचा 1362 किलो वजनाचा सुका गांजा नष्ट करण्यात आला.

 ही कारवाई रविवार, दि. 11 मे 2026 रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारतीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
 मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.

 सर्वोच्च न्यायालयातील फौजदारी अपील क्र. 652/2012 मधील निर्देश, केंद्र सरकारचे नियम, तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि ANTF मुंबई यांच्या सूचनांनुसार जप्त अंमली पदार्थांचा तात्काळ नाश करण्याचे आदेश देण्यात आले होते.

 या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्षातील जप्त मुद्देमालाचा आढावा घेतला.
 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 गुन्ह्यांतील 1362 किलो सुका गांजा नाशासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
समितीने पडताळणी करून प्रस्तावास मंजुरी दिली.

 त्या नंतर सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत गांज्याचा पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीने खड्डा खोदून नाश करण्यात आला.
 संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

 या कारवाईवेळी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे सदस्य मा. पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदिप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच वजन-मापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे उपस्थित होते.

संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
 जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments