जळगाव: लक्ष्मी नगर परिसरातील बंद घरात चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. फिर्यादी राजेंद्र दुसाने हे कुटुंबासह दोन महिन्यांपासून पुण्यात असल्याने घर बंद होते. १२ नोव्हेंबर रोजी शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर घराची पाहणी केली असता एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर, गॅस शेगडी, तांबे पितळी भांडी यांसह एकूण अंदाजे ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळले.
घटनेवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोनि बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे १३ नोव्हेंबर रोजी संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एक अल्पवयीन मुलगा या दोघांसोबत गुन्हा केल्याचेही त्याने सांगितले.
चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून १४ नोव्हेंबर रोजी राहुल चौधरीलाही ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0 Comments