जळगाव (प्रतिनिधी): सोमवार दि. ३ ते बुधवार दि. ५ नोव्हेंबरदरम्यान जळगावच्या शिवतीर्थ (जीएस ग्राऊंड) येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा पुढाकार खासदार स्मिताताई वाघ यांनी घेतला असून दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन संस्थेच्यावतीने हे आयोजन केले जात आहे.
“एक उन्नत राष्ट्र की और...” या घोषवाक्याखाली भरविण्यात येणारे हे प्रदर्शन जळगावकरांसाठी पहिल्यांदाच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम ठरणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, मंगेशदादा चव्हाण, अनिल पाटील, किशोर आप्पा पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील व अमोल जावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात केंद्र आणि राज्य शासनाच्या ४० हून अधिक विभागांचे स्टॉल्स असतील.
यात कृषी, ग्रामीण विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, आयुष, मत्स्य पालन, मानक ब्युरो, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण मंडळ, विमान प्राधिकरण, अनुसूचित जाती वित्त मंडळ, तसेच जळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आदींचा समावेश आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शोध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली आहे. आठ शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात येणार असून विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी खुले असलेले हे प्रदर्शन नागरिकांना सरकारी योजना आणि नव्या उपक्रमांची माहिती मिळविण्याची एक अनोखी संधी ठरणार आहे.

0 Comments