मेहुणबारे पोलीसांची मोठी कारवाई; ९ वर्षांपासून फरार विनयभंगाचा आरोपी मुंबईतून अटक

जळगाव | सच क्राईम न्यूज |
मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने महिलांच्या विनयभंग प्रकरणातील तब्बल ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.
 या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्यात न्यायप्रक्रियेला गती मिळाली आहे.

 जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांनी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
या सूचनांच्या अनुषंगाने मेहुणबारे पोलीस स्टेशनने विशेष प्रयत्न सुरू केले.

मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा क्रमांक ९७/२०१६ भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार, राहणार शिरसगाव, तालुका चाळीसगाव, हा गुन्हा केल्यानंतर गेल्या ९ वर्षांपासून फरार होता.
 महिलांशी संबंधित हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला अटक करणे अत्यावश्यक होते.

आरोपीच्या शोधादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे तो मुंबईत वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानुसार प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एक विशेष पथक नियुक्त केले. पथकाने तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे अंधेरी, मुंबई येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे आणले.

त्यानंतर नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री. प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास शिरोळे, पोहेकॉ. शांताराम पवार, पो. कॉ. विनोद बेलदार आणि पो. कॉ. संजय लाटे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments