नशामुक्ती जनजागृती अभियानासह पोलीस काका-पोलीस दीदी उपक्रमाला किन्ही नाईक आश्रम शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
अमडापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनात राबवला जात आहे हा उपक्रम
प्रतिनिधी: रफिक खान,,,,,
उदयनगर : येथून जवळच असलेल्या किन्ही नाईक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांमधील पोलिसांविषयीची भीती कमी करणे आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ‘पोलीस काका-पोलीस दीदी’ उपक्रमांतर्गत १६ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात अमडापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोलीस काका) शिवाजी सुरडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ठाणेदार निर्मळ यांनी तंबाखू, दारू, बिडी, गुटखा आणि अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त राहण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत. तुम्हीही स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे.” तर, पोलीस काका शिवाजी सुरडकर यांनी चारित्र्य प्रमाणपत्राचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “कोणत्याही नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे आपले चरित्र जपणे महत्त्वाचे आहे. कोणी छेडछाड किंवा त्रास देत असेल, तर त्वरित पोलीस काका किंवा पोलीस दीदी यांच्याशी किंवा हेल्पलाइन क्रमांक १०९१,१०९८ व ११२ क्रमांकावर संपर्क साधा.”
या उपक्रमात आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी आणि महिलांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, नवीन कायद्यांबाबतही माहिती देण्यात आली.
अमडापुर पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेदार निर्मळ यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमित राबवला जात असून, पुढेही त्याची अंमलबजावणी सुरू राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना जबाबदार आणि सजग नागरिक बनण्यास प्रोत्साहित करतो, तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करतो आणि समाजात सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रेरणा देतो.
या कार्यक्रमात मपोहेकॉ (पोलीस दीदी) सपना पालवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान शेवाळे, आश्रम शाळेच्या अधीक्षक कोल्हे मॅडम आणि निकस सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या शिबिरातून मिळालेल्या माहितीचे आणि मार्गदर्शनाचे कौतुक केले.
0 Comments