जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

जळगाव:
चोपडा शहरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
 तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

 पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजता ते २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० दरम्यान चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारी परिसरात ही घटना घडली.
 प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३ वर्ष, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून खून करण्यात आला.

 या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 तपासादरम्यान आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) हे गुन्हा केल्यानंतर फरार झाले होते.
 गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईकडे पळाल्याचे निष्पन्न झाले.
 त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले.

 दरम्यान, आरोपी रेल्वेने जळगावकडे परत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून रेल्वेत चढून शोध मोहीम सुरू केली.
 नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र विश्वासात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या वैमनस्यातून हा खून केल्याची कबुली दिली.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
पोलिसांच्या या जलद आणि समन्वित कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा तपास अल्पावधीत पूर्ण झाला असून परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments