जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत तीन सराईत आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि सोन्याची अंगठी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात वाढत असलेल्या घरफोडी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथक सक्रिय केले होते.
दिनांक २३ ते २५ मार्च २०२६ दरम्यान गेंदालाल मिल परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १०,४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी घरफोडीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदिल शेख मजीद, गुफरान शेख करीम आणि कासिम सैय्यद अली यांचा समावेश आहे.
आरोपींकडून १० हजार रुपये रोख, चांदीच्या अंगठ्या, पैंजण आणि सोन्याची अंगठी असा एकूण सुमारे ३० हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या आरोपींनी यापूर्वीही शहरातील आणखी एका घरफोडी गुन्ह्याची कबुली दिल्याने दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. पुढील तपास सुरू असून आरोपींचा इतर गुन्ह्यांशी संबंध तपासला जात आहे.

0 Comments