जळगावात गावठी कट्टा प्रकरणात दोन आरोपी अटकेत

जळगाव:
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे.
 ही कारवाई कुसुंबा येथील एअरपोर्ट रोड परिसरात करण्यात आली.

 एमआयडीसी पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन परिसरात फिरत आहे.   या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

 दि. २८ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर रोडवरील तारा बिझनेस पार्क परिसरात संशयास्पदरीत्या दुचाकीवर फिरणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांनी पळ काढल्याने पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दोघांना पकडले.

 झडतीदरम्यान एका आरोपीच्या कमरेला गावठी कट्टा व खिशात तीन जिवंत काडतुसे आढळून आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक ठकुबा गुंजाळ (वय २८, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, रा. सिल्लोड, जि. संभाजीनगर) अशी आहेत.

 चौकशीत आरोपींनी हा कट्टा जळगावातील तांबापुरा परिसरातील अजय बिरजू गारंगे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
संबंधित अजय गारंगे सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

 या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस क्र. २३१/२०२६ अन्वये आम्र्स अॅक्ट कलम ३/२५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी पिस्तुल (किंमत अंदाजे २०,००० रुपये), तीन जिवंत काडतुसे (३,००० रुपये), बजाज कंपनीची पल्सर RS 200 मोटारसायकल (१,००,००० रुपये) आणि एक अँड्रॉईड मोबाईल (१०,००० रुपये) असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस कर्मचारी चेतन पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.

Post a Comment

0 Comments